Menu

आमच्या विषयी

 श्री गणेशाच्या कृपेने परळ सारख्या गिरणगावात, सामान्य गिरण कामगारांनी चालविलेला ‘परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क,परळचा राजा‘ ही संस्था यावर्षी ७८ वे वर्ष साजरे करीत आहे. गेली ७७ वर्ष ताठ मानेने संस्था चालविणे व तिचा दर्जा टिकवणे ही महत्त्वाची बाब आहे. परंतु आजच्या स्पर्धेच्या युगात आमचे गणेशोत्सव मंडळ सहकारी पध्दतीने चालविणे फार मोलाचे आहे. तर हे असेच कार्य ठेवून आमचे मंडळ शतकाकडे झेप घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते कटिबध्द आहोत.

    सन १९४७ साली गणेशोत्सव मंडळाने गणपती उत्सवाची सुरूवात केली. नरेपार्क मैदानात सर्व गणेश कार्यकर्ते एकत्र येवून या गणेशोत्सव मंडळाचा वटवृक्ष झाला. या सर्व कार्यात आजी व माजी सर्व कार्यकत्यांनी मोलाची कामे केली. दुर्देवाने काही कार्यकर्ते आज हयात नाही, याची आम्हाला खंत आहे. मंडळ अनेक अडचणींना व आर्थिक संकटांना तोंड देत सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असताना अनेक निष्ठावंत सभासद व कार्यकारी सभासदांचे बहुमोल सहकार्य लाभले. हे मोलाचे कार्य येणाऱ्या पुढील कार्यकत्यांना कधीही विसरून चालणार नाही.

    एकवीसाव्या शतकाकडे वाटचाल करताना हे स्पर्धा युग असल्याने निरनिराळे मैदानी व शैक्षणिक स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या. त्याच बरोबर शैक्षणिक माध्यमात व क्रीडा क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी उज्वल यश प्राप्त केले त्यांचे कौतुक व गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. हे करताना कोणतीही व्यवहारीक काटकसर सभासदांसमोर आणली नाही.

    आज आम्ही अभिमानाने सांगतो आमचे गणेशोत्सव मंडळ सुशिक्षित व जाणकार कार्यकर्त्यांच्या संगनमताने सरकार दरबारी नोंदणीकृत करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व सभासदांनी जास्त प्रेमाने कार्यास सुरवात करायला पाहिजे. आता गणेशोत्सव मंडळ हे फक्त गणपती उत्सवापुरती मर्यादित नसुन त्यासाठी अनेक प्रकारची कार्ये अर्थात सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात सामावून घेतले पाहिजे.

    मंडळ शतकपूर्ती करण्यासाठी सर्व सभासदांनी जोमाने कामास लागले पाहिजे. कारण आपला वाढदिवस साजरा करित असतो तेव्हा आपण आपल्या आयुष्याचा एक दिवस कमी करीत असतो. आपले आयुष्य कमी होत असते. पण संस्था कोणासाठी थांबत नसते. संस्था कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने वाढत असते. नवीन कार्यकर्त्यामुळे संस्थेचे आयुष्य वाढते. सर्व सभासदानी लक्षात ठेवले पाहिजे की, आपण ज्या वेळी मानव जातीत जन्म घेतो तेव्हा त्या जातीचे देणे म्हणून समाजाची सेवा करणे व ती सेवा संस्थेच्या माध्यमातून करणे योग्य ठरेल. आपण सर्व सुज्ञ सभासद असून आपले आज ५००० देणगीदार व जाहिरातदार आहेत. पण आजपावेतो कोणतीही तक्रार मंडळाच्या कार्यकारिणीवर आलेली नाही. आणि यापुढेही गालबोट लागणार नाही, याचीही जबाबदारी सर्व सभासदांची आहे. कोणत्याही अडीअडचणीला तोंड देण्याची विश्वस्तांची तयारी आहे. कार्यकर्त्यांची साथ हवी आणि साथ लाभेल याची आम्ही पूर्ण खात्री बाळगतो.

    तरीही या ७३ वर्षात सर्व हितचिंतक, कार्यकर्ते, सभासद यांनी गणेशोत्सव मंडळास  ७४ वर्षापर्यंत पोहोचविले त्या सर्वांचे जाहिर आभार व शतकमहोत्सवी वर्षाकडे झेप घेताना श्री गणराया चरणी एकच मागणे मागतो की, हे गणराया मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना सद्बुध्दी देवो, या मंडळास अखंड एकता लाभू दे, अशी प्रार्थना करून आम्ही आमचे मनोगत पूर्ण करतो.                                                                                                         

vitthal chavan  *मंडळाकडून मुर्तीकार कै. पद्माकर पाटील व कार्यसम्राट व्दिवंगत आमदार कै.विठ्ठल चव्हाण यांना भावपु्र्ण श्रध्दांजली.*